Posts

सावज !

पानातून सांडलेलं उन पिऊन , मातलेल्या केवड्याचा गंध ; अंधुक अंधुक उजेडातून , रापलेल्या देहाचा रंग ; वक्षांवरून पसरलेले – दोन आंधळे नाग ; पाखरांना भूल पडते , अशा श्वासांचा पहारा ; भूर भूर वाऱ्यावर , निळी-हिरवी साद घालत , भटकणारा राघू केधवा , विवरातून अडखळतो , जहरी अंधार-ओढीने – सावज असा सापडतो .

मेघ !

गडद झाडीचा रंग ओथंबून ओघळतो पाठीवर मानेवरून कांकणभर पाउस ठिबकतो वाहतो धुकट ओल्या बोटातून आभाळभर पाणी वाऱ्यानं हलावं तशी तुझी पावले पडतात काळाहून मंद, तमाइतकी सावध, पंचमावर तोल सावरीत धैवतावरून कोसळतात मत्त चालींची सुप्त गीतं तेव्हा घ्यायचा असतो थोडा श्वास हवी असतांत काही उत्तरं !

तू...

कुछ टूटे हुए झरोंके कुछ रुके हुए मंज़र उल्फत में तेरी दिलसे कभी निकली हुई सिसकिया सब बहते हें मेरी आँखोमे - कभी झील कभी रात की तरहां एक खामोश सा पल सहम सा जाता हें फिर तू उसमे घुल-मिल सा जाता हें...

रंगपंचमी

या रंगपंचमीला उडणारा पाण्याचा प्रत्येक थेंब - जाळत जाईल गावच्या गावं आणि पाडत जाईल खिंडारं शेकडो वर्ष जपलेल्या मानवी मनातल्या हळव्या मनो-यास बरं झालं ते पाहायला आता वांझ नद्या आपल्यात नाहीत, बरं झालं हे वहायला आता डोळ्यातले झरेदेखील नाहीत; कदाचित म्हणूनच की काय सगळीककडं अगदी आलबेल आहे. रहा, तुम्ही तुमच्या मस्तीत रहा पण लक्षात ठेवा - ह्या रंगीत अपमानाचं पाणी मातीत रुजून पुन्हा उगवेल डोळ्यातल्या झ-यांना आणि पावसातल्या वा-यांना घेऊन पुन्हा बरसेल. ते झेलण्याची ताकद देवाने तुम्हास द्यावी - अशी भोळसट अपेक्षा मी ठेऊ? का?

सवाल

तुझ्या डोळ्यांच्या काठावर कलंडलेले थेंब... उसने देशील का?... तुझ्या हातातला मखमली रुमाल... विसरू जाशील का?... तुझ्या उनभिजल्या ओठावरचे शब्द... बोलशील का?... तुझ्या नजरेची पाषाण शिळा... फोडून जाशील का?... तुझ्या रंगरुसल्या चेहऱ्यातलं हसू... पोसशील का?... 

जाग

कधी जाग यावी; उकळत्या कॉफीत आळस फेकून द्यावा; उठून मग खिडकी उघडावी उजव्या हातानं, आणि डाव्या हातातल्या कपामधली कॉफी, थंड होईपर्यंत पीत राहावी; भिरभिरणारं पावसाचं पाणी आणि कावराबावरा झालेला हरवलेला छोटासा पक्षी, दोघांची तळमळ मग निर्ढावलेल्या डोळ्यांनी पाहत रहावी; विजेच्या तारेवरली थेंबांची कसरत बघून टाळ्या वाजाव्यात मनातल्या मनात; टप टप टप टप आणि मग ठप ठप ठप, आणि ऐकत रहावी सगळी सळसळ; वाटतं कधी तरी यावी अशी जाग.

कणखर

स्वप्नांच्या मखमली आश्वासनांवर विसंबून उताणी पडलेली रात्र आठवली की काळजात चर्र होतं. कधी काळी याच रात्रीच्या आळोख्या-पीळोख्यांवर जीव ओवाळून टाकला होता. स्वप्नं असतातच जहरी, दिवस-रात्र धडपडणाऱ्या उरातील श्वासास फूस लावून पळवून नेणारी. नशिबाचे वादळी तडाखे बसले आणि नियतीनं दाखवली पाठ की मग येते जाग, मग शोधतात स्वप्नं आसरा, स्वतःच कालवलेल्या विषारी मनात; मग घेता येतो रात्रीच्या केसांतला मोगरी श्वास, आणि होता येतं फुलपाखरांच्या पंखांइतकं कणखर !